नारकोटिक कोर्ट आणि नायजेरियन आरोपी
मी मुंबई सिटी सिव्हिल कोर्टात रुजू झालो आणि तिसऱ्या महिन्यात नारकोटिक कोर्ट मिळाले. नारकोटिक कमर्शियल क्वान्टिटीचे अनेक आरोपी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सापडलेले. त्यातील बरेच साऊथ आफ्रिका साईडचे. त्यातील एक आरोपी नायजेरियन होती. तिशीतील. साधारण उंचीची, गुबगुबीत, नखे लांब वाढलेली, त्यावर हिरव्या निळ्या रंगाची उठावदार नेलपॉलिश आणि गळ्यात, हातात, कानात तशाच रंगाच्या खड्यांची मॅचिंग ज्वेलरी. लक्षात राहण्याचे कारण ती गर्भार होती आणि एक दीड महिन्यात ती तुरुंगात बाळंतीण झाली होती. मी असे पावेतो तिची केस संपली नव्हती आणि तिचा जामीनही झाला नव्हता. जर ती भारतीय राहिली असती तर तिने आपल्या त्या मुलाचे नाव निश्चितच श्रीकृष्ण ठेवले असते कारण की जन्माष्टमीच्या दिवशीच तिची प्रसूती झाली होती.
रोख जामीनाची पद्धत
नारकोटिक कोर्टात बऱ्याच जामीनदारांच्या नोटिसा न बजावता परत येत असे. एकतर जामीनदार खोटे किंवा जामीनदार मुंबई बाहेरचे किंवा मुंबई पोलिसांना त्यांचा बंदोबस्त इत्यादी कामाचा ताण.
मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी. त्यामुळे मी रोख रकमेच्या जामीनाची ऑर्डर करायला सुरुवात केली होती. दहा हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत. फार मोठ्या रकमेची जामीन द्यायला आठ पंधरा दिवसांचा कालावधी लागत असे सबब रोख रक्कम लगेच कोर्टात जमा केल्या जात, सॉल्व्हंट श्युअरीटीचा जामीन मंजूर झाल्यानंतर रोख रक्कम परत घेतली जात असे. अनेक केसेसमध्ये केस संपे पावेतो रोख जामीन कायम ठेवत. रोख रकमेच्या जामीन आदेशांमुळे, सिटी सिव्हिल कोर्टातील रजिस्ट्रीच्या लोकांचे धाबे दणाणले होते. पंधरा एक दिवसानंतर ते लोक माझ्याकडे आले आणि सर रोख रकमेच्या जामीनाचा आदेश करू नका म्हणून विनंती केली. परंतु ते मला संयुक्तिक कारणे देऊ शकले नव्हते. मी माझीच पद्धत सुरू ठेवल्यामुळे कदाचित त्यांच्या पर्स/पाकीटाला खिंडार पडले होते. त्यांचा विरोध मावळायला जास्त वेळ लागला नव्हता.
बदली आणि कर्मचाऱ्यांचा स्नेह
मुंबई सिटी सिव्हिल कोर्टातून माझी बदली नागपूरला झाली. शेवटच्या दिवशी, माझ्या सवयीप्रमाणे, मी प्रत्येक दालनात जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांचे, त्यांनी मागील अडीच वर्षात दिलेल्या सहकार्यासाठी आभार प्रदर्शन करून आलो. त्यांना मी जिथे कुठे असेन, तिथे आल्यावर भेटण्याचीही विनंती केली. यात जेमतेम पंधरा वीस मिनिटे गेली असतील. या झप्पीचा काय परिणाम होईल मला पुसटशीही कल्पना नव्हती.
सायंकाळी साडेचार पाचच्या सुमारास ॲडमिनिस्ट्रेशन, फायनान्स इत्यादी सर्व विभागाचे जवळपास आठ दहा सीनियर्स माझ्या चेंबरमध्ये आले. भलामोठा बुके आणि कॅडबरीचे दोन मोठे पॅकेट्स मला देत म्हणाले साहेब आमच्या दालनात येऊन आम्हाला थँक्यू म्हणणारे आपण पहिलेच साहेब!
सौ. गीतांजली दातार, मुंबई सिटी सिव्हिल कोर्टातील माझ्या बेंच क्लर्कला माझे आजचे लेखन समर्पित.
सौ. गीतांजली दातार आणि माझे सहकारी श्री. एम. वाय. मानकर साहेबांच्या बेंच क्लर्क सौ. प्रविना म्हैसकर मॅडमने मिळून दिवाळीत, कोर्ट कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात डोला रे डोला या गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले होते! प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात त्या न्हाऊन निघाल्या होत्या.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.