बचावाच्या साक्षीदारांची अजब मागणी
प्रश्न : तुम्हाला बचावाचे साक्षीदार तपासायचे आहे का?
उत्तर : होय
- मुख्यमंत्री
- ऊप मुख्यमंत्री
- गार्डियन मिनिस्टर सातारा
- चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र
- रजिस्ट्रार जनरल बॉम्बे हाय कोर्ट
- पी. डी. जे. सातारा
- कलेक्टर सातारा
- डी. एस. पी. सातारा
ॲट्रॉसिटी ॲक्टच्या खटल्यात दोन आरोपींपैकी एका दहावी/बारावी फेल वार्ताहर आरोपीचे हे उत्तर होते. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३१३ खालील बयान झाल्यावर त्याने वरील साक्षीदारांना समन्स काढून मिळण्यासाठीही अर्ज केला होता.
एका आरोपीचे वकील होते श्री. अकबर. तर या आरोपीने वकीलच लावले नव्हते. त्याने स्वतःच साक्षीदारांचा उलट तपास घेतला होता. वास्तविक प्रथम वर्दीतील आरोप एवढ्या अतिरंजित स्वरूपाचे होते की विचारू नका. त्या तथाकथित आरोपांना सपोर्ट करणारा पुरावा तर सोडा, जो होता तो केसला वेगळ्याच दिशेला नेणारा होता. त्या आरोपीला साक्षी समन्सचा अर्ज मागे घ्या असे सांगणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे होते. अर्ज मंजूर करणे म्हणजे आजारापेक्षा उपचार जीवघेणा. गुणवत्तेवर अर्ज निकाली काढण्यात वेळ गेला असता. मग त्यावर किरकोळ अपील, रिट झाले असते. सोचा बिचकी पतली गलीसे निकलानाही बेहतर.
मोफत कायदेशीर मदतीचा निर्णय
मी सरळ निशाणी एकवर आदेश केला की सदर आरोपीतर्फे बचावाचे वकील नाहीत. त्यांना सदर आरोपीने नेमू न देता स्वतःच केस चालवली आहे. आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. आरोपी जरी वार्ताहर असतील, ते दहावी/बारावी नापास आहे. कायद्याचे त्यांना सखोल ज्ञान नाही. सबब त्यांचा बचाव मारला जाऊ नये यासाठी मी राज्य शासनाच्या खर्चाने सातारा येथील वरिष्ठ वकील श्री. नितीन वाडीकर यांना, त्यांच्या बचावासाठी नेमत आहे.
वाडीकर वकील साहेब खासकरून सिव्हिलचे दादा वकील. त्यांचे नावच समोरच्या पक्षकाराचे नामोहरम करण्यास पुरेसे आहे. त्यांचा पुकारा केला. माझा आदेश त्यांना वाचायला दिला. येस सर म्हणून त्यांनी त्यावर सही केली. वकीलपत्रावर त्या आरोपीची सही घेऊन ते केसकामी दाखल केले. तो साक्षी अर्ज श्री. वाडीकर वकील साहेबांनी स्वतः आणि त्या आरोपीच्या सहीने “Not Pressed” केला. लगेच सरकारी वकील श्री. सानप किंवा श्री. मुजावर किंवा श्री. पाटील, श्री. अकबर वकिलांचे युक्तिवाद ऐकले. वाडीकर वकील साहेबांनी श्री. अकबर वकिलांचे युक्तिवाद अंगिकारले. लगेच निकाल देऊन दोन्ही आरोपींना निर्दोष सोडले.
मागे वळून पाहताना वाटते, मी तसे केले नसते तर? तेव्हाच घरी बसायची पाळी आली असती परंतु देवा आभार तुझे त्या पाळीपासून तू मला वाचवले.
जाता जाता
सातारा येथे श्री. एस. एम. साखरे वकील साहेब. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. त्यांचा युक्तिवाद म्हणजे धिम्या, लयबद्ध आवाजातील लता रफीच्या स्वरातील मधुर युगलगीत. मी त्यांना म्हटले, वकील साहेब तुमचा आवाज आणि मधुर बोलण्याच्या स्टाईलवरून तुमचे आडनाव पडले होते काय? पुढील प्रत्येक तारखेला ते दारातूनच स्मितहास्याची पेरणी करत माझ्या डायससमोर येत.
क्वचितच मला डोकेदुखी घेऊन घरी जाण्याचा योग आला.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.