प्रशासनाची संधी आणि ५६ शिबिरांचे आव्हान
२००८-२०११ दरम्यान सातारा येथे तदर्थ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम करताना ॲडमिनिस्ट्रेशनचेही काम करण्याची सुवर्ण संधी मला माननीय पी. डी. जे. डॉ. लक्ष्मीराव मॅडमच्या काळात मिळाली होती.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माननीय सातारा पी. डी. जे.ला मे. उच्च न्यायालयाचे पत्र आणि त्यासोबत एक लाख बारा हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मिळाला. पत्रानुसार ३१ मार्चपर्यंत ५६ लीगल एडची शिबिरे घ्यायची होती. प्रत्येक शिबिरासाठी दोन हजार रुपये. शिबिर कोर्ट, सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, मंदिर, मस्जिद, एस. टी. स्टँड, गार्डन इत्यादी कोणत्याही ठिकाणी घ्यायची मुभा होती. उरलेल्या एकोणवीस-वीस कामाच्या दिवसात ५६ शिबिरे कशी शक्य आहेत? मॅडमने सायंकाळी सी. जे. एस. डी. श्री. तिवारी साहेब, सी. जे. एम. श्री. मगरे साहेब, मी इत्यादी सर्व जजेसची मीटिंग बोलावली. ते पत्र सगळ्यांनी वाचले. कोरस आवाज गुंजला की हे एवढ्या कमी अवधीत छप्पन शिबिरे अशक्य कोटीतील आहे. डिमांड ड्राफ्ट परत पाठवून, पुढील वर्षी हा कार्यक्रम राबवता येईल असेही मत काही लोकांचे पडले.
न्यायाधीशांचा उपाय आणि मॅडमची प्रतिक्रिया
मी मुग गिळून गप्प बसलो होतो. मॅडमने मला विचारले : बोहरी साब आपकी क्या राय है? आप चुप क्यों है?
मी म्हटले : सर २८-२९ मार्चच्या पूर्वीच सगळी शिबिरे शक्य आहे. सगळ्यांच्या आश्चर्यकारक नजरा माझ्याकडे वळल्या. काही तर मला “खाऊ की गिळू” या इराद्याने बघत होते.
मॅडम धडाडीच्या होत्या. त्यांनी विचारले, How?
मी म्हटले : सर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपण जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त जजेस आहोत. प्रत्येक जजने एक एक शिबिर, त्याला योग्य वाटेल तेव्हा, पाहिजे त्या ठिकाणी, दोन तीन वकिलांना सोबत घेऊन करावे. शिबिराचे दोन दोन फोटो घ्यावे. रिपोर्ट सादर करावा. झाली हु हु ची पु पु.
मॅडमच्या चेहऱ्यावर, भारताने १९८३ मध्ये कपिलच्या नेतृत्वाखाली विश्वकप जिंकल्यानंतर सगळ्यांना जो गगनात मावेनासा आनंद झाला होता, तेच भाव बघायला मिळाले होते. लगेच तसे पत्र इश्यू झाले आणि २३ मार्चच्या आत मुंबईच्या डाकमध्ये कंप्लायन्स लेटर विथ छप्पन फोटोज.
नागपूरमधील अनुभव आणि त्याची सातारा येथे मदत
या आयडियाचे श्रेय मी नागपूर पी. डी. जे. माननीय टी. व्ही. नलावडे (as then he was) साहेबांना देतो. सातारच्या अगोदर मी नागपूरला होतो. तेव्हाही असेच एक पत्र आले होते की स्त्रियाांसाठी एक शिबिर घेऊन रिपोर्ट सादर करावा. सरांनी मुख्य सी. जे. एस. डी. ला बोलावून सांगितले की लेडीज बारमध्ये जा, शिबिर तिथेच घ्या, फोटोज घ्या. सगळ्या जणी पर्स आवराआवरीच्या कामाला लागल्या होत्या. स्त्री पक्षकार देखील बऱ्याच प्रमाणात होत्या. जज साहेब इतर दोन लेडी जजेससोबत शिबिर घेत आहेत म्हटल्यावर घरट्याकडे जाण्यासाठी स्टार्ट झालेल्या स्कूटर्स देखील बंद पडून, स्टँडला उभ्या राहिल्या आणि सगळ्या स्कूटर स्वारींनी त्या हॉलच्या दिशेने. हॉल भरगच्च. शिबिर सफल. तो ऐकलेला अनुभव साताऱ्याला कामाला आला.
वेळेचा अपव्यय करणारे
याउलट सगळ्यांची शक्ती वाया घालवणारेही एक होते. अशा शिबिरांसाठी ते रात्री नऊ वाजेपावेतोच नव्हे तर सुट्ट्यांच्या दिवशीही रंगीत तालीमी घेत. त्याविषयी जास्त न लिहिलेलेच बरे.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.