स्वप्नपूर्ती आणि कारकिर्दीची सुरुवात
जून २००२ मध्ये पुणे येथे प्रमोशनवर जेव्हा पोहोचलो तेव्हा एका स्वप्नपूर्तीच्या आनंदाने न्हाऊन निघालो होतो. सुरुवातीला मला लहान स्टेशने मिळाली. हिंगणघाट, गंगापूर, मलकापूर, नांदुरा, डहाणू, पालघर. परंतु कधीही, एकाही स्टेशनचा वाईट अनुभव आला नाही. सगळीकडे वकील, पक्षकार, स्टाफने माझ्या कामाचे, माझी बदली झाल्यावर, तोंडावरच का होईना, खूप कौतुक केले.
राजधानीतील कारकीर्द आणि आव्हान
रणजी सामने कितीही खेळले, तरी खरी किंमत होते ती आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचेस, एक दिवसीय मॅचमधील खेळानुसार. वेळ आली आणि नंतर फक्त आणि फक्त राजधानींच्या ठिकाणी नंतरची कारकीर्द. पुणे पेशव्यांची राजधानी, नागपूर विदर्भाची (दोनदा), सातारा शाहू महाराजांची, मुंबई (दोनदा) महाराष्ट्राची. प्रत्येक ठिकाणी रथी महारथी वकील मंडळींच्या महासागरासोबत सामना. कुठेही, लहानशी देखील ठिणगी उडाली नाही.
अडीच मर्डरची केस आणि नराधमाची कहाणी
पुण्याला माझ्या कोर्टात अडीच मर्डर ची ही केस सुरू झाली. दोन आरोपी. पहिला तो. दुसरी ती. दोघांचे दोन वेगवेगळे वकील. तो मराठवाड्यातून रोजगारासाठी पत्नी, मुलगी ८-९ वर्षांची, मुलगा ६-७ वर्षांचा गावी ठेवून, पुण्यात आलेला. दिवस, महिने, वर्ष लोटले. एकटा जीव सदाशिव. तिच्याशी ओळख झाली. अशा ओळखी फार लवकर आणाभाका घ्यायला लावतात. मागे सोडलेले कुटुंब काटे बनून डसायला लागलं होतं. डेव्हिल’स माईंडने शीघ्र गतीने काम करायला सुरुवात केली होती. बाबाजी गावाला गेला, तुम्हासनी पुणे दाखवतो म्हणून त्यांना लालपरीत (महामंडळाची बस) बसवून देहू आळंदीला आणतो. तिची ओळख, “तुमची मावशी” म्हणून अपत्यांना करवितो. सायंकाळी मंदिराशेजारी शेव, चिवडा, बिस्किटे शेजारच्या हॉटेल मधून आणून मराठवाड्यातून घेतलेल्या दैनिकावर बसून ताव मारतात. खिशातली लालपरीची तिकिटे गोळा करून तिथेच टाकून, रात्री ते सर्व निळ्या आसमान तले झोपतात. सकाळी लवकर उठून, डोहात स्नान करून परत मंदिरात जाऊन दर्शन घेऊ, या इराद्याने. उघड्यावर, लवकर उजाड होत असतो. सगळ्यांना उठवले, डोहाकिनारी नेले. पत्नी, मुलगा, मुलगी, तो, ती असे एकापाठोपाठ उभे राहिले.
नराधमाचा गुन्हा आणि मुलीचा साहस
डोहातून पाणी ओंजळीत भरण्यासाठी पत्नी वाकल्याबरोबर त्याने पत्नीला धक्का दिला. नंतर मुलाला, मुलीला एक एक करून धक्का मारून त्यांना डोहात बुडवले. पाणी खोल होत. पोहता कोणालाच येत नव्हते. मराठवाड्यात पिण्याच्याही पाण्याची सोय नाही. पोहणे कुठे शिकणार?
पत्नी, मुलगा बुडाले. जाको राखे साईयां, उसे मार सके ना कोय मुलगी हुशार. बुडताना हात पाय मारता मारता तिच्या हाती झाडाची मजबूत जड (रूट) लागली. त्याआधारे तोंड पाण्याबाहेर काढून मुलगी श्वास घेत असल्याचे पाहिल्याबरोबर, नराधमाने एक मोठा दगड उचलून, तिच्या डोक्यावर फेकून मारला. अंतर जास्त नव्हतं. नेम बसून मुलगी रक्तबंबाळ झाली. आकाशाची लाली क्षणार्धात पाण्यावर तरंगू लागली.
मुलगी चाणाक्षही होती. तिला कळून चुकले होते की तो ती च्या पायी आई, भाऊ आणि तिला यमसदनी पाठवू इच्छितो. सबब ती त्या रूटच्या आधारे श्वास घेत अलगद पाण्यात तरंगत राहिली. त्या दोघांनी पाहिले की पाण्याची रक्ताळलेली लाली वाढली आहे आणि मुलगीही मेली असेल असे समजून ते आल्या दिशेने चालायला लागले.
मुलगी साहसी देखील होती. परिस्थितीची चाहूल घेऊन मुलीने हळूच डोके वर काढून त्यांना हातात हात घालून जाताना पाहिले. ते दिसेनासे झाल्यावर मुलगी थरथरत पाण्याबाहेर आली. नोव्हेंबर डिसेंबरची पुण्याची कातील सर्दी होती.
पुढे काही अंतरावर झोपडी वजा घरे होती. तेथील बाया शेकोटीवर आपापल्या शिदोऱ्या तयार करीत होत्या. मुलगी शेकोटीजवळ पळाली. तिच्या डोक्यातून रक्त स्त्राव सुरूच होता. ती एवढ्या थंडीत, एवढ्या पहाटे चिंब भिजलेली होती. थापलेली भाकर तशीच टाकून, त्या आजीने मुलीला जवळ घेतलं आणि काय झालं म्हणून विचारले. आजीने लगेच धनी मार्फत मंदिरातील पुजाऱ्याला बोलवून घेतले. पोलीस पाटील, पोलीस, दवाखाना, डोहात प्रेतांची शोधाशोध, घटनास्थळावरून दैनिक, तिकिटे इत्यादी जप्त करून आरोपींचा शोध घेतला गेला. ते त्या रात्री दुसऱ्या गावाच्या मंदिराच्या छतावर पती पत्नी म्हणून राहिले होते. तेथील पुजाऱ्याचेही बयान घेतले गेले. बऱ्याच अथक प्रयत्नानंतर दोन्ही प्रेत मिळाले होते. दोषारोप पत्र दाखल झाले. आरोपी शेवट पावेतो अटकेत होते. पुरावा कसा गोळा करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही केस. सरकारी वकिलांनी, बहुधा श्री. साळवी साहेब, एकदम हाय क्लास रीतीने केस चालवली होती. सगळ्यांच्या सहकार्यामुळे केसचा निकाल लवकर लागण्यास मदत झाली होती.
मराठीतील निकाल आणि न्याय
पुरावा सुरू झाला. मराठी टायपिस्ट नुकतेच बदलून माझ्या कोर्टात आले होते. ते ही मराठवाड्यातलेच. पूर्वी ते संभाजीनगर येथे एका मराठी लेखकाकडे टंकलेखक म्हणून काम करत होते. सबब त्यांची गती, शुद्धता स्तिमित करणारी होती. विचार आला की निकाल पत्र मराठीतूनच का देऊ नये. Acquittal चे अनेक निकाल आढळतील, परंतु Conviction चे क्वचितच. लगेच पी. डी. जे. माननीय आर. सी. चव्हाण सरांच्या (as then he was) कानावर ही गोष्ट टाकली की मी मराठीत निकाल देतोय. त्यांनीही माझी हौसला अफजाई केली. मलाच विचारले Why not? Go ahead. स्टेनो सौ. ईटक्याल मॅडम ला दुसरे डिक्टेशन देऊन, डायस वरच मराठीतून डायरेक्ट टायपिंग. एक सव्वा तासात त्याच्या हाती निकालाची प्रत. त्याला आजीवन कारावास.
तीच्या तर्फे श्री. कोसे वकिलांनी केस चालवली होती. ती फक्त त्याच्या सोबतीला होती. तिला, त्याच्या डोक्यातील षड्यंत्राची तसुभरही माहिती नव्हती. मुख्य घटनेची ती मुक साक्षीदार होती. जस्ट अ गुंगी गुडीया. सबब Common Intention अभावी तिला निर्दोष सोडणे भाग होते.
त्याने मे उच्च न्यायालयात अपील केले. राज्य शासनानेही तिच्या सुटकेविरुद्ध अपील केले. दोन्ही अपीले एकत्रित निकालाने लेडीशिप विजया तहीलरमाणी मॅडमने (as then she was) फेटाळून लावली होती.
तेव्हा मला त्याला मरेपर्यंत फाशी देण्याचा मोह झाला होता. सरकारी वकिलांचीही तशी मागणी होती. परंतु त्याने स्वतःच्याच कुटुंबाला तर संपवले होते. माझ्या मते तो विरळातला विरळ (rarest of rare) गुन्हा नव्हता. प्रसिद्धीच्या मागे न जाता, निकाल असा देण्याचा प्रयत्न केला की वरच्या कोर्टालाही त्यात हस्तक्षेप करायला वाव नको.
आता ती मुलगी कुठे काय करत असेल माहीत नाही! परंतु रोज ती आपल्या आईला, भावाला मिस करत असेल याबद्दल शंका नाही.
पुण्याची हनी व्हेज केस डोके वर काढत आहे. नेक्स्ट टाइम….आणि हो आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. हापूस विसरून कसे चालेल?
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.