कौटुंबिक न्यायालयात भांडणारे नवरा बायको
कौटुंबिक न्यायालय नागपूर येथे नवरा बायको माझ्या कोर्टात गेल्या दोन वर्षांपासून भांडत होते. नवरा एकुलता एक, पोस्ट ग्रॅज्युएट, दुमजली चांगले घर असलेला, ८००००-९०००० पगार कमावणारा होता. त्याचे वडील पूर्वीच वारले होते. घरात तो, त्याची आई, दोन टवटवीत अपत्ये.
एके दिवशी सर्व सामान, अपत्यांना घेऊन ती वेगळी, भाड्याच्या घरात राहायला लागली. तिच्या वडिलांचीही तिला साथ होती. नवऱ्याचा दावा, तिने नांदायला यावे म्हणून तर तिचा दावा घटस्फोटासाठी. खावटीची वेगळी केस. तिने फौजदारी कोर्टात देखील दोन केसेस नवरा, सासूवर दाखल केल्या होत्या.
सामोपचाराचे अयशस्वी प्रयत्न
मी आपसात त्यांचे भांडण मिटावे म्हणून खूप प्रयत्न केले होते. तोही सन्माननीय तोडग्यासाठी तयार होता. परंतु तिने माझ्या प्रयत्नांना मुळीच दाद दिली नाही.
पत्नीची अनोखी त्रास देण्याची पद्धत
एका तारखेला नवरा, त्याचे वकील श्री. मसूद शरीफ माझ्या डायससमोर आले आणि मला नवऱ्याने ट्रॅफिक पोलिसांकडे पाचशे रुपये दंड भरल्याची मोबाईलमधील ऑनलाइन पावती दाखवली. मागील एक महिन्यात अशा प्रकारे पाच वेळा त्याच्या खात्यातून प्रत्येकी पाचशे रुपये दंड ऑनलाइन वजा झाले होते. ते कसे?
तो ॲक्टिवा स्कूटरचा रजिस्टर्ड ओनर होता. स्कूटर मात्र बायकोच्या ताब्यात. नवऱ्याला आर्थिक, मानसिक त्रास देण्याची अफलातून कल्पना तिला मिळाली होती. रोडवर ती विना हेल्मेट स्कूटर चालवायची आणि स्कूटर मुद्दामहून अशा सिग्नलवर थांबवायची की जिथे तिच्या स्कूटरचा नंबर ऑनलाइन कॅमेरे कैद करतील. ती विना हेल्मेट असल्याने लगेच दंड बसे आणि दंडाची रक्कम नवऱ्याच्या खात्यातून वजा होत असे.
तोडगा काढण्याचे प्रयत्न आणि पत्नीचा नकार
नवरा स्कूटर तिच्या नावे करून द्यायला तयार होता. परंतु तिला ते नको होते. दुसऱ्या विकल्पासही ती तयार झाली नाही की तिने ती स्कूटर नवऱ्याला परत करावी म्हणजे तो तिला नवी, तशीच स्कूटर घेऊन देईल.
न्यायाधीशांचा अजब आदेश
घी सीधी ऊंगलीसे नहीं निकलता. नाइलाजास्तव मला आदेश पारित करावा लागला होता की यानंतर त्या स्कूटरपायी नवऱ्याला कोणताही दंड भरावा लागला तर तो तिला मिळत असलेल्या खावटीच्या रकमेतून वजा केला जाईल. माझ्या या आदेशामुळे नवरा तर जाम खुश झाला होताच, नागपुरातही ट्रॅफिक रूल पाळणाऱ्यांमध्ये एका नागरिकाची भर पडली होती.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.