भूतकाळाचे वर्तमानकाळात रूपांतर
एखादी केस आपल्या पुढे चालली नाही तरी त्या केसची अंतिम सुनावणी, निकाला विषयी जेव्हा कळते, तेव्हा त्या केसचा भूतकाळ एका क्षणात वर्तमान काळात बदलतो.
बदली आणि दैवी योजना
मी नागपूरला २००५-२००८ मध्ये होतो. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश. तीन वर्षे कसे संपले माहीत सुद्धा पडले नाही. वाटलं चौथ्या वर्षी लहान मुलगा दहावीत गेल्याने रिटेंशन हमखास मिळेल. सर्व डिटेल्स, कागदपत्रे ट्रान्स्फर अर्जात दिले होते. अनायसे मोठ्या मुलाचेही शेवटचे कॉलेजचे वर्ष साधले जाणार होते. बार, स्टाफ, लिटिगंट्स इत्यादी कोणाचीही तक्रार नव्हती. मे. प्र. जि. न्यायाधीशांचाही शेरा + होता. तरी जे न करी हरी, ते करी रजिस्ट्री. माझी बदली सरळ साताऱ्याला ८०० किमी लांब. रडायला आलं होतं. हिम्मत केली. गेलो. तेथील शाळा, कॉलेज लई भारी. तिथे इम्रानची दहावी, अकरावी, बारावी एकाच ठिकाणी झाली. तेव्हा कळले की सरते शेवटी ते “त्याचेच” बेत होते. कर्ता करविता तोच होता. तो जे करतो, ते आपल्या भल्यासाठीच असते.
फाशीची शिक्षा आणि जुन्या खटल्याची आठवण
तेथून २०११-२०१६ मुंबई. त्या दरम्यान टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी की नागपूर येथील जिल्हा न्यायाधीश कु. विभा इंगळेंनी दोन आरोपींना मरेपर्यंत फाशी दिली.
लगेच हर दिल अजीज जि. न्या. सादिक अली साहेबांना नागपूरला फोन करून इंगळे मॅडमचा नंबर मिळवला. मॅडमला फोन केला. अभिनंदन केले की चला सरतेशेवटी सात आठ वर्षानंतर त्या केसचा निकाल लागला. अगोदर तर त्यांनाही अनोळखी माणसाकडून फोन आल्याने हायसे वाटले होते. परंतु काही क्षणातच लक्षात आले की त्या केसमधील एका आरोपीला मीच डिस्चार्ज केले होते आणि केस चालवताना त्यांनी तो आदेश अनेकदा वाचून काढला होता, सूर जुळायला वेळ नाही लागला.
गंभीर गुन्ह्यातील आरोपीला डिस्चार्ज
एका गावातून रात्री तिचेच दोन नातेवाईक, मिळकतीच्या वादातून, तिला फरफटत घराबाहेर घेऊन गेले, जाताना घराला बाहेरून कडी लावून गेले. सकाळी गावकरी प्रात:विधीसाठी रानात गेले असता, त्यांना त्या मुलीचे प्रेत नग्न अवस्थेत दिसले. तिच्या घरच्या लोकांना, पोलिसांना बोलावले गेले. तेव्हा नागपूर असेंब्ली सुरू होती. तिथे विरोधी पक्षातर्फे सदर घटनेविषयी गांभीर्याने हरकती मांडल्या गेल्या. आरोपी फरार होते. पोलिसांचे धाबे दणाणले होते. संपूर्ण मीडिया त्या घटनेची २४x७ फडशा पाडत होता. मुख्य आरोपी क्र. १ एका पोल्ट्री फार्मवर पहारेकरी म्हणून राहायला होता. उद्रेक शांत करण्यासाठी लगेच पोलिसांनी पोल्ट्रीच्या मालकाला (आरोपी क्र. ३) अटक केली, साठ दिवसांपर्यंत रिमांड, तरीही मुख्य आरोपी सापडेना. सबब कंपल्सरी बेलवर अटकेतील आरोपी क्र. ३ तुरुंगाबाहेर. नंतर मुख्य आरोपी मिळाल्यावर सामूहिक बलात्कार, खून इत्यादी आरोप, आरोपी क्र. १, २ वर तर आरोपी क्र. १ ला शरण दिल्याचा आरोप (under section २१२ of IPC) आरोपी क्र. ३ वर. खटला जे. एम. एफ. सी. च्या कोर्टात दाखल होऊन, सेशन कमिट झाला. त्यानंतर आरोपी क्र. १, २ तुरुंगातून पळून गेले. आरोपी क्र. ३ नियमितपणे प्रत्येक तारखेला कोर्टात हजर.
मी नागपूरला रुजू झाल्यावर सदर केस पकड वॉरंट स्टेजवर मला बघायला मिळाली. वकील, साक्षीदार, सरकारी वकील जर उशिरा आले तर माझ्यासारख्या न्यायाधीशांना नॉन इफेक्टिव्ह स्टेजवरीलही केसेस बघण्यात मजा येते. या केसमध्ये तर आरोपी क्र. १ हा आरोपी क्र. ३ च्या पोल्ट्री फार्मवरून घटनेच्या दुपारी जो गेला तो परत आलाच नव्हता. घटनेच्या काही महिन्यांनंतर त्याला लांबच्या ठिकाणाहून अटक करण्यात आली होती. तर मग आरोपी क्र. ३ ने आरोपी क्र. १ ला घटनेनंतर आसरा कसा दिला? गुन्ह्यापूर्वी तो आरोपी क्र. ३ कडे कामाला होता. तो काही गुन्हा नाही. ही बाब श्री. आसिफ कुरेशी, मुख्य सरकारी वकिलांच्या लक्षात आणून देताच त्यांनीही सहमती दर्शविली. लगेच निशाणी क्र. १ खाली एक दीड पानाचा आदेश करून आरोपीला, त्याच्या अर्जाशिवाय, डिस्चार्ज केले.
न्यायाधीशांचे काम आणि श्रद्धा
आरोपी क्र. ३ डिस्चार्ज झाल्यानंतर सरळ मंदिर/मस्जिद/चर्चमध्ये जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केली नसेल, कशावरून? कारकिर्दी दरम्यान मी फारसा मशिदीत गेलो नाही. एकही जुम्मा नमाज मशिदीत अदा केली नाही. माझे डायस, माझे कामच माझी नमाज राहिली. माझ्यासाठी ते काम माझ्या कोर्टातील पक्षकारांनी केल्याची मला खात्री आहे. त्यामुळेच तर आमच्यासारख्यांचे आज सत्तरीत देखील दररोज बारा तेरा किमी चालणे फिरणे कायम आहे. पोटभरून झोप. नातवंडांचे ऐश्वर्य. जेव्हा कधी बोलावणे आल्यास आनंदाने परलोक प्रवासाचीही तयारी.
आठवणींचे मोरपीस
आज दोन तीन दशकानंतरही अशा अनेक केसेस मोरपिसांसारख्या मनाच्या पुस्तकात सुरक्षित आहेत.
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.