बदलीचा पहिला दिवस आणि अपमानास्पद अनुभव
काल परवा बदल्यांचे आदेश आले आणि माझी मे १९९९ मध्ये नांदुऱ्याहून डहाणूला झालेली बदली, स्टेशन बघण्यासाठी, संमीश्र भावनांनी ओथंबलेली, माझी डहाणूची पहिली भेट तरोताजा झाली.
नवीन स्टेशन, भाड्याचे घर, मुलांच्या शाळा, बँक, गॅस, इत्यादी कितीतरी गोष्टींच्या शहानिशेसाठी बदली झालेल्या न्यायाधीशाला बदलीच्या ठिकाणी, सामान, कुटुंब नेण्या अगोदर जावे लागते. मी ब्रीफकेस घेऊन डहाणूला पोहोचलो. त्याच दिवशी माझे पूर्वाधिकारी कै. वाईकर साहेब त्यांच्या नवीन ठिकाणी आपले नवीन स्टेशन बघण्यासाठी गेले होते.
माझे सहकारी न्यायाधीशांचा बंगला कोर्ट आवारातच होता. मी सकाळी नऊच्या सुमारास कोर्ट आवारात पोहोचलो. वाटलं तेथील बंगल्यातील साहेबांना प्रथम भेटावे. दार ठोठावले. मॅडमने दरवाजा उघडला. मी नमस्कार करून सांगितले की मी बोहरी, नांदुऱ्याहून बदली होऊन आलो आहे.
लगेच त्या म्हणाल्या: साहेब ट्रेनिंगसाठी नागपूरला गेले आहेत. तुम्हाला हॉटेल पाहिजे तर पुढे थोड्याच अंतरावर आहे आणि खाडकन दरवाजा बंद.
तो अपमान, थोबाडीत चपराक बसल्यागत होता. नामोहरम काय असतं ते अनुभवलं. तेव्हा STD call चा जमाना सुरू झाला होता. मोबाईल सर्वांकडे आले नव्हते. आले असल्यास नंबर काहींनाच दिले जात कारण इनकमिंग फोनलाही दाम लागत असे. कै. वाईकर साहेबांशीही पूर्वीची ओळख नव्हती. म्हटलं, कोर्टातच जावं. दहा वीस पावले चाललो असेल, समोरून शिपाई सुधाकर आले. अनुभवी माणूस असल्याने, त्यांचा कयास खरा होता की नवीन साहेब दिसताहेत. माझ्या हातातून ब्रिफकेस घेत, त्यांनी मला आमच्या कोर्ट चेंबरमध्ये नेले.
अनपेक्षित आपुलकी आणि आदरातिथ्य
वाईकर साहेबांच्या खुर्ची शेजारी स्टूलवर डायल सिस्टीमचा काळा फोन होता. मला न विचारताच सुधाकरने वाईकर वहिनींना फोन केला आणि सांगितले की नांदुऱ्याहून नवीन साहेब आले…. सुधाकरचे बोलणे पूर्ण होऊ न देता, त्यांनी फर्मान सोडले साहेबांना फोन दे. सुधाकर मला फोन देत म्हणाले, वाईकर मॅडम. मी कपाळावर हात मारला. नको नको म्हणत होतो तरी त्याने मला रिसीव्हर घ्यायला भाग पाडले. रिसीव्हर कानाला लावला. मी हॅलोचा अजून ह च उच्चारला होता, समोरून आदेश बोहरी साहेब, तुम्ही खूप लांबून आला आहात, थकला असाल. अगोदर घरी या, फ्रेश व्हा, जेवण करा, नंतर बाकीचे बोलू. मी सुधाकरला सांगते. तो आपणास घरी आणेल. मी हो नाही म्हणण्या अगोदर फोन बंद.
त्याच फोनची परत कर्कश रिंग वाजली. सुधाकरने फोन उचलला. सौ. वाईकर वहिनींचाच फोन होता. तो फक्त होय मॅडम, होय मॅडम करत होता. बोलणे संपल्यावर सुधाकरचाही मला आदेश: चला साहेब.
वाईकर साहेबांच्या पहिल्या मजल्यावरील घरी पोहोचलो. त्यांच्या आई, सौ. वाईकर मॅडम आणि त्यांच्या मुलींनी माझं मनापासून स्वागत केलं, आस्थेवाईक चौकशी केली. ते लोक अकोल्याचे. फ्रेश झाल्यावर आमरस, पुरणपोळी, वगैरे कितीतरी चविष्ट पदार्थ! अजूनही विश्वास बसत नाही. वर्ग शिक्षकाने मी नापास झालो म्हणून शंभर छड्यांनी सोलून काढल्यावर, हेडमास्तरांनी जिल्ह्यात पहिला आलो म्हणून सांगावं….असंच काहीतरी अविस्मरणीय त्या एक दीड तासात घडलं. कुठल्या तरी पूर्व जन्माचं नातं, अचानक व्हायब्रेट झालं होतं.
अविस्मरणीय आठवण आणि खंत
पंधरा दिवसांनी मी डहाणूला शिफ्ट झाल्यावर, माझी वाईकर साहेबांसोबत पहिली आणि शेवटची भेट झाली. तेव्हा त्यांचे कुटुंब अकोल्याला गेले होते. तेथून परस्पर नवीन स्टेशन.
सेवानिवृत्ती अगोदर आणि त्यानंतर देखील, दरवर्षी बदली आदेश आल्यावर वाईकर कुटुंबियांनी केलेले माझे आदरातिथ्य मनाला चटका लावून जाते. त्यांना आजपावेतो मस्त मेजवानी न देता आल्याची खंत आहे. वाईकर कुटुंबियांना कुर्णिसात आणि मनाचा मनाशी प्रश्न, त्या आता कुठे आहेत?
Author Profile

-
B A, LL B
Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.