Down the Memory Lane: ‘वर्मा’चा स्पर्श!

‘वर्मा’वर बोट ठेवताच माणूस आणि समाज चवताळून उठतो.

डहाणूतील अनुभव: प्रलोभनाचा नकार

जून १९९९ मध्ये डहाणू येथे रुजू झालो. काही दिवसांनी सुट्टीच्या दिवशी गणवेशातील उत्पादन शुल्क अधिकारी माझ्या शासकीय निवासस्थानी आले. प्रोटोकॉल म्हणून चहा दिला. चहा झाल्यावर ते म्हणाले, “सर, आणखी लागल्यास कधीही सांगा” आणि सोबत आणलेला बॉक्स उघडला. त्यात दारूच्या दहा-बारा बाटल्या होत्या. आयुष्यात दारू-सिगारेटला कधीही स्पर्श न केल्याने, मी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि पुन्हा असे न करण्यास सांगितले. फुकट मिळत असलेल्या गोष्टीचा मोह न झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार.

न्यायदानात निष्ठा: प्रेरणादायी किस्सा

न्यायदानासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे ही पूर्वजांची पुण्याई. माझी पहिली पोस्टिंग हिंगणघाट. अनेक रथी-महारथी वकील मंडळी, त्यातील एक नाव म्हणजे ॲड. इक्बाल साहेब. त्यांची तीन मुले, तनवीर भाई, सलमान भाई आज न्यायव्यवस्थेत, तर एक भाऊ उच्च पदावर कार्यरत.

गेल्या आठवड्यात बोलताना सलमान भाई, जे थेट जिल्हा न्यायाधीश म्हणून रुजू झाले, म्हणाले, “मी जेव्हा न्यायव्यवस्थेत रुजू झालो, तेव्हा माझ्या मोठ्या भावाने सांगितले, ‘सलमान, कोणतेही चुकीचे काम करू नकोस. लाच खाणे म्हणजे दिवंगत वडिलांच्या शरीराचे मांस खाण्यासारखे आहे.'” हे ऐकून माझ्या अंगावरही काटा आला. आयोगाने भरपूर पगार आणि सुविधा दिल्यानंतर, आपल्या पेशाशी पैशांसाठी गद्दारी कशाला?

शहादा येथील आठवण: गरिबीची चव

शहादा येथे वकिली करताना माझे वरिष्ठ मित्र श्री. अनिल भाई पाठक यांनी सांगितलेला धुळ्यातील एक संवेदनशील किस्सा, कोणताही प्रामाणिक व्यक्ती विसरू शकणार नाही.

धुळे येथे उद्योजकांची सभा. गोलाकार टेबलावर बैठक. समोर सुका मेवा ठेवलेला. बियरचे पेले दिले जात होते. चार्टर्ड अकाउंटंट साहेबांनी ‘एकच प्याला’ घ्यायला नकार दिला. शेजारी बसलेले उद्योजक, अध्यक्ष त्यांना आग्रह करू लागले, “सर, याला कोण नकार देतो? ‘चखकर’ तर बघा.” त्यावर त्यांनी दिलेल्या चार शब्दांच्या उत्तराने, क्षणात सर्वांच्या तोंडातील बियर पळाली. ते म्हणाले, “मी गरिबीची चव चाखली आहे.”

नैतिकतेचा धडा: सोमरसेट माघमची कथा

न्यायमूर्ती चव्हाण साहेबांनी JOTI मध्ये सांगितलेली सोमरसेट माघमची कथाही नमूद करावीशी वाटते. त्यात काही कमी-जास्त असल्यास सरांनी क्षमा करावी.

एक प्रामाणिक मध्यमवर्गीय मुलगा शहरात जातो. कॅसिनो पाहून तो भारावून जातो. एकदा खेळून बघायला काय हरकत आहे म्हणून खेळतो आणि जिंकतो. रात्री हॉटेलमध्ये मुक्काम. आयत्या मिळालेल्या पैशामुळे तो वेश्याकडे जातो. क्रीडा संपल्यावर तो बेशुद्ध होतो, तेव्हा ती त्याच्या खिशातून पैसे काढून पलंगाशेजारील फ्लॉवरपॉटमध्ये लपवते. तो हे पाहतो. त्या फ्लॉवरपॉटमध्ये तिच्याही कमाईचे पैसे असतात. नंतर तीही बेशुद्ध होते आणि गाढ झोपते. तो मुलगा हळूच उठतो आणि फ्लॉवरपॉटमधील सर्व पैसे घेऊन पळून जातो. अशाप्रकारे पहिल्या मोहामुळे तो दुसर्‍या आणि तिसर्‍या मोहाला बळी पडतो आणि एकापाठोपाठ एक गुन्हे करतो. अत्यंत नीच कृत्य.

या कथेचा नैतिक धडा असा आहे की, एकदा पाय घसरला की तो घसरतच जातो. पहिल्या घसरणीला जर आपण पथ्य पाळले, तर सन्मानाने निवृत्त होऊ शकतो. विचार करा, नाहीतर ‘व…र…मा’लाही शिक्षा मिळेल! मतिमंद झालेल्यांना ‘इथे जा, तिथे जा, यशस्वी व्हा’ सांगून काय उपयोग?

Author Profile

I M Bohari
I M Bohari
B A, LL B

Practised at Shahada, Dist Dhule (Now : Nandurbar) June 1985 to July 1990.
Appointed as a JMFC and CJ JD on 16.8.1990 at Wardha.
Thereafter transferred to Hinganghat, Gangapur, Mallapur, Nandura, Dahanu.
CJ SD Palghar
Adhoc D and S Judge Pune, Nagpur, Satara
City Civil Judge Mumbai
Family Court Judge Mumbai
Principal Family Court Judge Nagpur
Retired on superannuation on 31.5.2018
Appointed as a Member, Mah Electricity Regulatory Commission from 6.6.2018 to 31.5.2023
Thoroughly enjoyed Mediation Work in Family Courts at Mumbai, Nagpur.
Now camping at Dallas, Austin in Texas.